
रत्ननगरीत मेडीकल कॅालेजसुवर्णाक्षरांनी नोंदणारा क्षण,अविश्वसनीय घटनेचे शिल्पकार आणि सर्वस्वी श्रेय उद्योग मंत्री उदय सांमत यांनाच!
रत्नागिरीत एमबीबीएस कॅालेज हे शासकीय मेडीकल महाविद्यालय सुरु झाल्याची बातमी वाचली आणि खरं तर त्यावर अजूनही विश्वास बसत नाही. खरं तर हे अविश्वसनीयच वाटत रहाते! आणि सर्वसामान्यांनाही ते तसेच वाटत आहे. मात्र आज रत्नागिरी वासींयाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकणारे वास्तव प्रत्यक्षात साकारले आहे. कॅपराऊंड द्वारा महाराष्ट्रातील आणि देशभरातील १०० विद्यार्थी यांचे रत्नागिरी मेडीकल कॅालेजमध्ये अॅडमिशन होऊन महाविद्यलयाचे डीन डॅा. जयप्रकाश रामानंद यांच्या नेतृत्वाने सुरु झाल्याची वृत्ते प्रत्यक्ष तमाम रत्नागिरी करांनी पाहिली. या सार्या अविश्वसनीय घटनेचे शिल्पकार आणि सर्वस्वी श्रेयाचे हकदार आहेत या मतदार संघातील आमदार पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सांमत. ना. उदय सांमत यांचे रत्नागिरी जिल्ह्यासाठी असणार्या या योगदानाची नोंद जिल्ह्याच्या इतिहासांत सुवर्णक्षणांनी नोंदली जाईल हे निश्चित. पुढील अनेक दशके येथील विद्यार्थी, पालक आणि तमाम नागरीक या कार्यासाठी सामंत यांचे योगदान महत्वपूर्ण मानतील.
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय हे त्या जिल्ह्याच्या आरोग्य आणि सामाजिक आर्थिक विकासाशी थेट जोडलेले असते. १९८३ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी असतांना आंबेजोगाई येथील साहित्य संमेलनाला आम्ही काही जण गेलो होतो. त्यावेळी त्या उजाड माळरानावर आमची रहाण्याची व्यवस्था स्वामी रामानंद तीर्थ मेडीकल कॅालेजमध्ये केली होती. त्या ओसाड माळरान आणि तेथे उभे राहीलेले १९७५ मधील ते देशातील पहिले ग्रामिण मेडीकल महाविद्यालय खर्या अर्थाने मराठवाड्यातील आरोग्य आणि विकासाचा मुलभूत पाया होता. ते पाहील्या नंतर सतत वाटत राही की रत्नागिरी जिल्ह्यात असे मेडीकल कॅालेज होणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवेची सातत्याने असणारी हेळसांड, अपुर्या सुविधे अभावी होणारे मृत्यू . येथील रुग्णालयातून कधीही उपलब्द नसणारे वैद्यकीय अधिकारी या समस्यांची जड अखेर येते ती स्थानीक डॅाक्टर जोपर्यंत नाहीत आणि त्यांना आवश्यक सुविधा येते उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत हे असेच असणार, यावर एकच उपाय जोपर्यंत येथे मेडीकल महाविद्यालय होत नाही तोपर्यंत स्थानिक डॅाक्टर्स तयार होणार नाहीत.
अनेक राजकीय पटलावर चर्चा सत्रात , इलेक्शन कॅम्पेन आणि थेट भेट -चर्चातून हा मुद्दा सातत्याने येत राहीला. मधल्या काळात रत्नागिरी जिल्ह्याला पालकमंत्रीही इंपोर्ट करावे लागत होते. कारण येथील आमदार बहूदा पालकमंत्री पदाच्या निकषात बसत नसावेत कींवा त्यासाठी आवश्यक आमदानी क्वालीफीकेशन बसत नसावे, जे काही असेल ते. भाई सावंत आरोग्य मंत्री असतांना आणि त्यांचा मंत्रीमंडळात वरचष्मा असतांना त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले परंतू ते बीएएमएस त्याचा फायदा सिंधुदुर्गात नक्कीच झाला. त्यांनतर महाराष्ट्राच्या विविध भागात मेडीकल कॅालेज मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यातील बहूतांश ही खाजगी संस्थांची होती त्यातील लाखो रुपयांची फी आणि डोनेशन्स हे कोकणी जनतेच्या आवाक्या बाहेरचे होते. येथील डॅाक्टरांच्या मुलांना ते शक्य होते मात्र सर्वसामान्य ज्या घरातच वैद्यकीय परंपरा नाही तेथील गरीब आणि वंचीत कुटुंबातील मुले या क्षेत्राकडे जाण्याची शक्यता नव्हती. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री दिग्वीजय खानविलकर असतांना रत्नागिरी जिल्ह्यासाठी राखीव मेडीकल कॅालेज शासनाच्या कोठ्यातून मंजूर होते. मात्र ते स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्याबाबत जागरुक नाही. त्यांना त्यांची फारशी किंमतही नाही याचा परिणाम येथे आवश्यक बेडचे हॅास्पिटल नाही, जागा नाही, विद्यार्थी येणार नाहीत, हॅास्टेल नाही, स्टाफ मिळणार नाही अशी सुमार कारणे देत ते मेडीकल कॅालेज थेट कोल्हापूरला नेण्यात आले. आणि रत्नागिरी येथील शासकीय मेडीकल महाविद्यालयाची संधी हूकली.
त्यांनतर डेरवण येथील वालावलकर ट्रस्ट ने जिल्हयात उत्तम स्वरुपाची आरोग्य यंत्रणा आणली त्याला अद्यावतता दिली. आवश्यक इन्फ्रा टप्याटप्याने उभे करत अप्रतिम असे मेडीकल कॅालेज उभे केले. आज डेरवणला १०० सीटचे मेडीकल महाविद्यालय आहे. ह्यावर्षी तेथील पहिली बॅच बहूदा बाहेर पडेल. त्यांनतर नारायण राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्रतिम मेडीकल महाविद्यालय उभारले. मधील काळात सुनिल तटकरे यांनी अलिबाग येथे शासकीय मेडीकल महाविद्यालय उभारले.
या पार्श्वभूमिवर इतक्या दिर्घ प्रतिक्षेनंतर रत्नागिरीत सुरु झालेले शासन अनुदानित मेडीकल महाविद्यालय ही रत्ननगरीच्या सुवर्णक्षणाची साक्षिदार आहे. आज येथे १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील फक्त ४ विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. पुन्हा येथे कोकणी मानसिकता पुढे आलीच, आपल्या येथे सुरु होणारी कोणतीही गोष्ट ही सुमार दर्जाचीच असणार त्यापेक्षा पुणे मुंबई कडे धावण्याची कद्रु मानसिकता आहेच. तीही बदलली पाहीजे. शासकीय मेडीक महाविद्यालयातील प्रवेशासाठीचे निकष थोडे अधिक कडक असतात. यासाठी आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्यात जागृतता निर्माण होणे आणि प्रेरफरन्समध्ये या कॅालेजच्या मान्यतेचा विचार हा भाग महत्वाचा ठरणार आहे. हा अवेअरनेस येथील शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी करणे गरजेचे आहे. मेडीकल अभ्यासक्रम हा ५ वर्षाचा असतो. ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार, त्यांचे रहाणे, होस्टेल सोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, त्या अनुषंगाने येणार्या अनेक बाबी हे त्या शहराचे अर्थकारण बदलत असतात, कोकणातील मुलांना उच्च शिक्षणाच्या शासकीय मोफत सुविधा सोबतच नव्या रोजगाराच्या अफाट संधी या शहरात येत आहेत. या संधीचा लाभ कोकणवासीयांनी घेणे गरजेचे आहे.
मेडीकल महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार्या आणि ते प्रत्यक्षात साकारणार्या रत्नागिरीचे आमदार पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे मनापासून आभार !
अभिजित हेगशेटये
उपाध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था संघटना