
खेडचे पोलीस निरीक्षकांनी हल्ल्याच्या घटनेनंतर माझी तक्रार घेतली नाही, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा आरोप
माझ्याकडून कामापोटी १० लाखांची खंडणी मागणार्याविरोधात तक्रार देताना शिंदे शिवसेनेचे अण्णा कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांची नावे असल्याने तक्रार घेण्यास खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी नकार दिला. त्यामुळे येथील गुंडगिरी व खंडणीखोरांना त्यांचाही पाठिंबा असल्याने त्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम, गृहमंत्री योगेश कदम यांच्या आशीर्वादाने खेड-लोटे औद्योगिक वसाहतीत गुंडराज सुरू असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. जाधव पुढे म्हणाले की, मी सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यामुळे माझी सुवर्णभास्कर इन्फ्रास्ट्रक्चरल प्रा. लि. कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारची खाजगी व शासकीय कामे करीत असतो. त्याप्रमाणे मी लोटे येथील विजय केमिकल कंपनीचे रितसर निविदा भरून काम घेतले आहे. हे काम सुरू असून तिथे सुपरवायझर म्हणून दर्शन शिंदे हे काम पाहतात. या कंपनीचे काम सुरू केल्यापासून शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता सचिन सुधीर काते हा सातत्याने कामाच्या ठिकाणी येवून शिंदे यांच्यासह कामगारांशी दादागिरी करून ठार मारण्याची धमकी देत असे. सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष करा असे आपण सर्वांना सांगितले होते.
असे असताना ६ नोव्हेंबरला काते हा सचिन रघुनाथ कालेकर, रोहन रविंद्र कालेकर यांना घेवून पुन्हा कामाच्या ठिकाणी आला व त्याने शिंदे यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली.www.konkantoday.com




