बिगर फिडे मानांकित खेळाडूंच्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या मानस सिधये याने पटकावले. एकूण सहा फेऱ्यांमध्ये साडे पाच गुणांसह त्याने निर्विवाद जेतेपद तर निधी मुळ्येने पाच गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले.
ऋत्विक मुसळे पाच गुणांसह तिसरा आला. मंडणगडच्या पार्थ लिमयेने साडेचार गुणांसह चौथा तर सई प्रभुदेसाई व यश खेर यांनी प्रत्येकी चार गुणांसह अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात गार्गी मयेकरने प्रथम स्थान मिळवले. १७ वर्षे वयोगटात आदिती पाटील, १४ वर्षे वयोगटात आर्यन धुळप, ११ वर्षे वयोगटात रूमिन वास्ता व ८ वर्षे वयोगटात पारस मुंडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण करसल्लागार राजेश सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. फिडे मानांकन नसलेल्या आणि विशेषकरून ग्रामीण भागातील खेळाडूंना क्लासिकल स्वरूपात डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष शिरधनकर, विवेक सोहनी, चैतन्य भिडे यांनी परिश्रम घेतले.
www.konkantoday.com