साडेतीन किलो सोनं, 64 किलो चांदी अन् पाच कोटींची कॅश; लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांचं भरभरुन दान

0
90

‘लालबागच्या राजा’च्या चरणी आलेल्या दानाची मोजदाद मंडळाकडून करण्यात आली आहे. तर यामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी आलेली एकूण रोख रक्कम ही कोटींच्या घरामध्ये असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आहे. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि चौसष्ट किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी भरभरुन दान भक्तांकडून केलं जातं. तर या दानाची मंडळाकडून मोजदाद देखील करण्यात येतं. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोने आणि चांदीचा लिलाव केला जातो. त्यामधून जी रक्कम जमा होते, त्यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं दान भाविकांकडून केलं जातं.
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीपासूनच भक्तांनी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केली होती. तर यंदाही रोख रक्कम, सोनं आणि चांदीचं भरभरुन दान करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी भाविकांकडून केलेल्या दानामध्ये 42 लाख रुपयांची रोख रक्कमेची नोंद करण्यात आलीये. तर 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी 60, 62, 000 रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी 183.480 ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलंय. तसेच 6,222 ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली.
पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
मुंबईतील गणेशोत्सव हा देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांचा देखील उत्सुकतेचा विषय आहे. त्यातच लालबाग, गिरगाव यांसारख्या भागातील गणेशोत्सव हा अगदी दणक्यात साजरा केला जातो. लालबागचा राजा, गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतींची विशेष ख्याती आहे. लालबागच्या राजाचं आणि भाविकांचं एक खास नातं आहे. लालबागच्या राजाच्या चरणी केला जाणारा नवस हा पूर्ण होतो, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी देखील ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here