
अमेरिकेतून आलेल्या दोन पर्यटकांचा मांडवी किनारी गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहात सहभाग
गणपती बाप्पाच्या मनमोहक रूपाची भुरळ अमेरिकेतून रत्नागिरीत आलेल्या दोन पर्य़टकांनाही पडली आहे. अमेरिकेतून आलेले हे दोघेजण मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते.अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना वाजत-गाजत भक्तीभावात निरोप देण्यात आला. रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जन सोहळा झाला. या विसर्जन सोहळ्यात दोन विदेशी नागरिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जोएल आणि टेलर हे आठवडाभरापूर्वीच हिंदुस्तानात आले आहेत. तीन दिवस गणपतीपुळे येथे मुक्काम केल्यानंतर गुरुवारी ते दोघे रत्नागिरीत आले. त्यावेळी ते फिरत फिरत मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आले. त्यावेळी मांडवी किनाऱ्यावर विसर्जन सोहळा सुरू होता. गणपतीबाप्पाचे मनमोहक रूप पाहून त्या दोघांनाही त्याची भुरळ पडली. किनाऱ्यावर सुरू असलेल्या बाप्पाच्या आरतीमध्ये टाळ्या वाजवत ते सहभागी झाले. त्यांनी आरतीनंतर भक्तीभावाने प्रसादही घेतला.जोएल आणि टेलर यांनी मिरवणुकीत असलेल्या ढोल ताशाचाही अनुभव घेऊन आनंद व्यक्त केला त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसह विसर्जनासाठी समुद्रात उतरत त्यांनी गणेश विसर्जनाचा सोहळा अनुभवला.
www.konkantoday.com