अपंगत्वावर मात करणाऱ्या धीरज यांच्या प्रयत्नाचे मुंबईकरांनी केले भरभरून कौतुक
अगदी दोन्ही हात आणि उजव्या पायाला जन्मजात अपंगत्व असतानाही देखील रत्नागिरी येथील धीरज राजेंद्र साटविलकर मोठ्या उमेदीने प्रत्येक कला जपत आहे. त्याने मुंबई-प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे महाराष्ट्र शासनाच्या ”गणेश फेस्टिव्हल” येथे सहभागी होऊन चक्क एका पायाने श्री गणेशाची मूर्ती साकारली. अपंगत्वावर मात करणाऱ्या धीरज यांच्या प्रयत्नाचे मुंबईकरांनी भरभरून कौतुक केले.
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील भागिर्थी भवनमध्ये ते भाड्याने राहतात. आई-वडील आणि एक भाऊ असे साटविलकर यांचे कुटुंब; पण धीरज यांना जन्मापासून दोन हात व एक पाय लहान आहे. एका पायाने ते किमया करतात. घरात राहून त्यांनी अपंगत्व विसरण्यासाठी कलांशी दोस्ती केली आहे. लहानपणापासून ते पेंटिंग करतात. मूर्तिकला, हार्मोनियम वाजवणे यात ते पारंगत आहेत. ते शासनाच्या गणेश फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले. गणेश फेस्टिव्हलला आलेल्या अनेक लहान-मोठ्या कलाकारांमध्ये त्यांनी एका पायाने शाडू मातीची गणेशमूर्ती साकारली. मुंबईकरांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांचा आनंद द्विगुणित केला. धीरज यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, गानकोकीळा लता मंगेशकर, साईबाबा, बाळासाहेब ठाकरे, गणपती बाप्पा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पेन्सिल वर्क व पेंटिंग पोर्ट्रेटही हुबेहूब साकारली आहेत.
www.konkantoday.com