शिंदे गटाने आम्हाला व्हिप बजावला तर ते त्यांच्या अक्कलेचे दिवाळे वाजलेले आहे- खासदार विनायक राऊत
निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, त्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष स्वतंत्र झाला आहे. शिंदे गटही स्वतंत्र झाला आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना वारंवार पत्र व्यवहार करत असतो.त्यामुळे शिंदे गटाला आम्हाला व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. तरी सुध्दा शिंदे गटाने आम्हाला व्हिप बजावला असेल, तर ते त्यांच्या अक्कलेचे दिवाळे वाजलेले आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक रा राऊत यांनी केली आहे.
दिल्ली येथे लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान नविन लोकसभा भवनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, खा. राजन विचारे, खा. ओमराजे निंबाळकर व खा. संजय जाधव अनुपस्थितीत राहिले होते. यासाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना व्हिपचे उल्लंघन केले म्हणून नोटीस बजावली आहे. याबाबत खा. राऊत यांनी विचारले असता ते म्हणाले की, अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही.
मुळात आमचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आम्हाला व्हिपची नोटीस येवू शकत नाही. आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठ खासदार संसदेत आहोत, त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देवून आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे नोंद केलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने आम्हाला व्हिप देवू नये, आम्हीसुध्दा तसा मुर्खपणा करणार नाही. महिला विधेयकाला विरोध करण्याचा आमचा विषयच येत नाही, आम्ही महिला विधेयकाला विरोध करणारच नाही. महिला विधेयकाला आमचे समर्थन आहे, पण या विधेयकाच्या माध्यमातून महिलांना फसविण्याचे काम मोदी सरकार करत आहे अशी टीका त्यांनी केली
www.konkantoday.com