
रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयातील सात विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक यांची थायलंड येथील मत्स्य आणि मत्स्यसंवर्धन या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाकरिता निवड
रत्नागिरी, – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत जागतिक असलेल्या रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील सात विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक यांची थायलंड येथील चुलालॉकॉन युनिव्हर्सिटी येथे मत्स्य आणि मत्स्यसंवर्धन या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली आहे. सात विद्यार्थी एक महिन्याकरिता आणि एक प्राध्यापक १५ दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता थायलंडला रवाना झाले आहेत. उर्वरित दोन प्राध्यापक १५ दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता पुढील आठवड्यात जाणार आहेत.
राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी जागतिक बँकेकडून अनुदान दिले जाते. याला नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि शिक्षण संचालक यांनी प्रयत्न केले होते. या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांमध्ये डॉ. प्रकाश शिंगारे, डॉ. अनिल पावसे आणि डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नील जाधव, देव रंजनी, रोहित आपटे, अमरेंद्र कुमार, प्राची डोंगरकर, विराज दवंडे आणि गार्गी पालेकर यांचा समावेश आहे. मत्स्यसंवर्धनामध्ये अग्रेसर असलेल्या थायलंड देशातील मत्स्यसंवर्धनाच्या विविध पद्धतीमधील संशोधनाचा अभ्यास करून त्याचा उपयोग कोकणासह राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांना कसा करता येईल यावर प्रशिक्षणात विचारमंथन होणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते झाला. यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिंगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर व डॉ. सुरेश नाईक यांच्यासहविद्यापिठातील सर्व सहयोग अधिष्ठाता आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
www.konkantoday.com