शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्यानवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
“कोकण विभागातील शिक्षक व पदवीधरांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा.”
– कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई, दि.26 :- मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि.30 सप्टेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 या कालावधीत यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, कोकण विभागातील पदवीधरांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. आज कोकण भवनातील समितीसभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारत निवडणूक आयोगाकडून दि. 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या घोषित कार्यक्रमानूसार मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदारसंघाची टप्प्या टप्याने नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानूसार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी मतदार नोंदणीसाठी जाहिर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दि.25 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी नमुना -18 किंवा नमुना-19 द्वारे दावे व हरकती स्विकारणाचा अंतिम दिनांक राहील. दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल. दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल. दि. 23 नोव्हेंबर 2023 ते दि.09 डिसेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारली जातील. दि. 25 डिसेंबर 2023 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल. दि. 30 डिसेंबर 2023 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल . अशी माहिती आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी यावेळी दिली.
शिक्षक मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत. अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करतांना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शिक्षक मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघाची सर्वसाधारणपणे रहिवासी आहे तसेच जिने दिनांक 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये राज्यातील एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे, अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना 19 मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
पदवीधर मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत. अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करतांना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2023 पुर्वी किमान 3 वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. 3 वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधीकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. नमुना 18 मधील अर्जासोबत पदवीशी समतुल्य म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता (Specified Qualifications) या पुरावा स्वसाक्षांकीत केलेला व अतिरिक्त पदनिर्देशीत अधिकाऱ्यांनी अधिप्रमाणीत करुन जोडणे आवश्यक आहे.
खोटे निवेदन व खोटी माहिती देणारी व्यक्ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र असेल. नमुना 18 मधील छापील अर्ज मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळविता येईल. हस्तलिखीत टंकलिखीत चक्रमुद्रीत किंवा खाजगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील.
www.konkantoday.com