
पोलिसाला धक्काबुक्की, रिक्षाचालकाला जामीन
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप असलेल्या रिक्षाचालकाची न्यायालयाने २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. रमेश चंद्रकांत खेत्री असे संशयित आरोपीचे नाव आहे. रमेश याच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला होता. तसेच अटकही करण्यात आली होती.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल निंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत प्रकाश बंडबे (३३) हे वाहतूक पोलीस शिपाई म्हणून काम करतात. २६ मार्च २०२३ रोजी साळवी स्टॉप येथील चिरायू रूग्णालयासमोरील रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियुक्तीला होते. सायंकाळी ६ च्या सुमारास रमेश खेत्री हा रिक्षा (एमएच ०८ एक्यू ५९६८) घेवून साळवी स्टॉप येथे आला. यावेळी रिक्षामध्ये नरेंद्र बाबुराव बिरादर (३३, रा. किर्तीनगर रत्नागिरी) व विक्रांत श्रीधर शिंदे (३१, रा. कारवांचीवाडी रत्नागिरी) हे बसलेले होते.
साळवी स्टॉप यथे प्रशांत बंडबे याला पाहताच रमेश याने प्रशांत याला शिवीगाळ करत तू मागे माझ्या भावाच्या रिक्षाचे फ्रंड सीटचा मोबाईलवर फोटो का काढलास अशी विचारणा केली. तसेच प्रशांत यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत तुम्ही लोकांचे वाटोळे करताय, मी सीटी पोलीस स्टेशनच्या गायकवाड पोलिसाला मारहाण केली होती. तुमच्या तंगड्या तोडून टाकीन, तुम्हाला ड्रेसवर नोकरी करायला देणार नाही, अशी धमकी देत रमेश याने दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. प्रशांत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी रिक्षाचालक रमेश खेत्री याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.
www.konkantoday.com