शीळ धरणाच्या नव्या जॅकवेलसाठी महिना उजाडणार
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील कोसळलेल्या जुन्या जॅकवेलमुळे आता नवी जॅकवेल कार्यान्वित करणे हाच एकमेव पर्याय नगर परिषदेसमोर उभा आहे. जॅकवेल कोसळल्यामुळे आता नव्या जॅकवेलचे काम पूर्ण होण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी जाणार असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर शहरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे ३५ वर्षापूर्वी शीळ धरणाची उभारणी केली होती. या धरणाच्या कालव्यात जॅकवेल बांधण्यात आली. तेथून पाण्याचा उपसा करून ते साळवी स्टॉप येथील मुख्य साठवण टाकीत आणले जात होते. त्याद्वारे संपूर्ण शहराला पाण्याचे वितरण सुरू होते. सुमारे ३५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेली जॅकवेलची इमारत पाण्याखाली भूभाग खचल्यामुळे तसेच बांधकाम कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही स्थितीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्माण झालेल्या धोक्याची पूर्वकल्पना जॅकवेलवरील कर्मचार्यांनी नगर परिषद प्रशासनाला यापूर्वी दिली होती.
शहरासाठी सुमारे ७ वर्षापूर्वी नवीन सुधारित नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. त्या नव्या कामाच्या आराखड्यातही जॅकवेलचा समावेश होता. सुधारीत नळपाणी योजनेतील जॅकवेलच्या इमारतीचे काम सातत्याने वादग्रस्त व चर्चेत राहिले आहे. हे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही त्या कामावर प्रश्न उभा राहत आहे.
नव्या जॅकवेलच्या आतील यंत्रसामुग्री कार्यान्वित नसल्यामुळे तेथून पाणी उचलणे शक्य नसून नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम ७ वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. नव्या जॅकवेलचे काम परिपूर्ण करण्यासाठी न.प. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे संकट उभे राहिले. न.प.च्या प्रशासनामार्फत जॅकवेलची पाहणीही करण्यात आली होती.
www.konkantoday.com