
खेड स्थानकात मंगला एक्सप्रेसच्या इंजिन समोर उभे राहून काही संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित तसेच गणपती स्पेशल गाड्या या तीन ते चार तास तसेच काही गाड्या तब्बल सात तास उशिरा धावत आहेत.यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्रवासी गाडीच्या वेळेनुसार प्लॅटफॉर्मवर आले असून त्यांना गाडी उशिरा असल्याचं समजल्याने आता अनेक तास वाट बघत बसावं लागत आहे. प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली. मंगला एक्सप्रेस काही संतप्त प्रवाशांनी थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. आधीच्या स्थानकातून रेल्वे गाड्या खचाखच भरून आल्याने तसेच आत मधून दरवाजे बंद केल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना आत मध्ये शिरता येत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेसच्या इंजिन समोर उभे राहून काही संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या गर्दीमध्ये एक युवक अक्षरशः गुदमरल्याने त्याच्यावर स्थानकातच प्रथमोपचार करण्यात आले. आरपीएफ आणि रत्नागिरी पोलीस यांच्यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही मात्र रेल्वे स्थानकात हजारो प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
www.konkantoday.com