
मुंबई, पुण्यातील येणार्या चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज
मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ हजार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये ७३ हजार लोकांची व्यवस्था करता येऊ शकते. त्यामध्ये शाळा, समाजमंदिरांचा समावेश आहे.
कोकणातील अनेक लोकं शिक्षण, नोकरीनिमित्त मुंबईत आहेत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली अाहे सध्या शासनानेही अशा लोकांना गावी पाठविण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या आहेत.
ग्रामीण भागातील रिकाम्या जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिरे, वस्तीस्थाने याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येत होती. शहरी भागात मंगल कार्यालये, सभागृह, शाळा-महाविद्यालयांचे हॉलही घेण्यात येणार आहेत. त्याची माहिती घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात ७३ हजार लोकांना विलगीकरणात ठेवता येईल अशी व्यवस्था करता येणे शक्य आहे. त्यासाठी पूरक १२ हजार ठिकाणे निश्चित करुन ठेवण्यात आलेली आहेत. अद्यापही चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासनाकडून निर्णय झालेला नाही.
मुंबईतून चाकरमानी दाखल झाले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामकृतीदलाकडे जबाबदारी सोपवली जाणार आहे. गावात सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी सरंपचांना जिल्हाप्रशासनाकडून पत्र पाठविण्यात आले असून त्यात चाकरमान्यांचे स्वागत करा अशी सुचना दिलेली आहे. काही गावांमध्ये सध्याच्या लोकसंख्येएवढी लोक मुंबईतून येण्याची शक्यता आहे. त्यांची व्यवस्था ठेवणे अवघड आहे. त्याचबरोबर त्यांना चौदा दिवस विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. ते एका ठिकाणी राहतीलच असे नाही. त्यांच्यावर वॉच ठेवणे तितकेच अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया गावस्तरावरुन येत आहेत.
www.konkantoday.com