चंद्रावर जाण्याची स्वप्न बघताना पृथ्वीशी असलेली नाळ तोडू नये-अरूण मोर्ये यांचा गणेशोत्सवात मखर सजावटीतून सामाजिक संदेश
पृथ्वीवरून चंद्राकडे झेपावणारी चांद्रयान 3 ची १० फूट उंचीची प्रतिकृती तयार करून यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी गावातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अरूण मोर्ये यांनी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला आहे.
स्वहस्ते बनविलेली आणि रंगवलेली चांद्रयानाची प्रतिकृती, स्वलिखित कविता ही या देखाव्याची खासियत आहे.
जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात असलेली विषमता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर आदर्श निर्माण करताना खेडेगाव आणि शहर यातील फरक ‘भारत आणि इंडिया’ च्या माध्यमातून साकारण्यात अरूण मोर्ये यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या देखाव्याची दखल पंचक्रोशीतील नागरिक, प्रतिष्ठीत वर्ग, रसिक मंडळी यांसोबत सोशल मीडियावर ही घेण्यात आली आहे.
“भारत आणि इंडिया मध्ये सुवर्णमध्य काढूया’
‘माणसाला माणसांशी माणसाने जोडूया..”
माणसाची संकुचित व दुसऱ्यावर कुरघोडी करणारी वृत्ती बाजूला ठेवून आपापसात असलेले मनभेद आणि मतभेदांच्या भिंती पाडून नवी सक्षम पिढी निर्माण करूयात असा आशावाद त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com