
गल्लीचे राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय कळणार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उबाठा गटावर खरमरीत टीका
विधानसभा हा ट्रेलर पूर्ण पिक्चर महापालिकेत दाखवू
मुंबई, ता. १९ जून २०२५
गल्लीत राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय करणार, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटावर केली. वरळी डोम येथे आयोजित शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची ऑपरेशन सिंदूर आणि परदेश दौऱ्याचे अनुभव उलगडणारी प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी घेतली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी परदेश दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १४० कोटी जनतेचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही आयुष्यातील मोठी संधी आहे. ती माझ्यासारख्या तरुणाला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याबाबत जेव्हा केंद्र सरकारकडून विचारणा झाली तेव्हा मनात दडपण आले होते. देशाची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायचे आणि त्यात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट होती. १४ दिवसांच्या या दौऱ्यात ज्येष्ठ नेत्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शिष्टमंडळातील सर्वच वयाने आणि अनुभवाने मोठे होते. यूएई, काँगो प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांतील प्रमुखांशी चर्चा केली. दोन देशांच्या संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली हा आपल्या कारकिर्दितील मोठा अनुभव असून तो भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. परदेशात एका कार्यक्रमात शिष्टमंडळातील डॉ. सस्मित पात्रा यांनी भाषणात माझा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. त्यानंतर शिष्टमंडळातील सर्वच सहकारी भाऊ बोलू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाऊ म्हणून उल्लेख केला आणि कामाचे कौतुक केले. यावरुन पंतप्रधान मोदी हे सातही शिष्टमंडळांच्या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवून होते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
शिष्टमंडळांचा परदेश दौरा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केल्याची टीका करणाऱ्यांचा खासदार डॉ. शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांना विधानसभेत ट्रेलर दाखवला आणि आता महापालिकेत पिक्चर दाखवू असा इशारा खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटाला दिला.
जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा होणार नाही. दहशतवादाला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचे काम सरकारने केले. पूर्व आफ्रिकेतील देश हे इस्लामिक स्टेट ऑफ कोऑपरेशन या संघटनेचे सदस्य आहेत. पाकिस्तानसुद्धा या संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे या संघटनेतील इतर सदस्य देशांसमोर पाकिस्तानचा बुरखा फाडल्याने भविष्यात ते पाकिस्तानला पाठिंबा देणार नाहीत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. अमेरिका आणि गयाना दौऱ्यातील अनुभव यावेळ खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले. अमिरिकेत गिटार वाजवण्यासाठी नाही तर पाकिस्तानची वाजवण्यासाठी गेलो होतो, असे खासदार देवरा म्हणाले. खासदारांच्या शिष्टमंडळांचे परदेश दौऱ्यांचे महत्व हे संजय राऊत आणि आसिफ मुनीर यांना कळणार नाही, कारण त्यांची ती कुवत नाही, अशी टीका खासदार देवरा यांनी केली.