वेळंब येथे दुचाकींच्या अपघातात एकजण जागीच ठार, दोन जखमी

गुहागर : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे दोन मोटारसायकलमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. या धडकेत दोघेजण जखमी झाले. सोमवारी (दि. 14) सायंकाळी 5.30 वा. हा अपघात झाला. जयराम बाबाजी नर्बेकर (वय 52, राहणार जानवळे-ओझरवाडी) असे मृत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. अपघाताबाबत अजय नामदेव नर्बेकर, (33, रा. सतीचा माळ, वेळंब रस्ता, ता. गुहागर) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जयराम नर्बेकर हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी वेळंब नालेवाडी येथे गजानन नांदलस्कर यांच्या घरी दुचाकीवरून (एम.एच 08 – बी 1279) आले होते. बहिणीला भेटून ते शृंगारतळीच्या दिशेने जाण्यास निघाले असता आबलोलीकडून शृंगारतळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीने ( एम.एच 08 -एस 8241) जयराम नर्बेकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर आदळले. जयराम नर्बेकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील बासीत दाऊद चिपळूणकर आणि साईक हानिफ तवसाळकर (दोघेही रा. पडवे) हे देखील गंभीर जखमी झाले. चिपळूणकर आणि तवसाळकर यांच्यावर चिपळूण येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button