महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ प्रमाणे १८ ते ३० सप्टेंबर नियमनात्मक आदेश
*रत्नागिरी, : जिल्ह्यात गणेशोत्सव १९ सप्टेंबर रोजी तर ईद ए मिलाद २८ सप्टेंबर रोजी सण साजरे करण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेस बाधा येवू नये याकरिता तसेच वरील नमूद सण शांततेत पार पडावेत, यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजीचे ००.०१ वा. ते ३० सप्टेंबर २०२३ रोजी २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा रॅलीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका अगर रॅली कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळेत काढाव्यात किंवा नयेत असे मार्ग किंवा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकींच्या, रॅलीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्यावेळी वा कोणत्याही रस्त्यावरुन वा सार्वजनिक जागी वा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असल्याचा संभव असेल, अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यांवर व रस्त्यांमध्ये, घाट किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर वा धक्क्यांमध्ये वा सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे.
कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे वगैरेचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनी क्षेपकांचा (लाऊड स्पिकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. सक्षम प्राधिका-यांनी या अधिनियमनाची कलमे ३३, ३४, ३५, ३७ ते ४१ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे.
जो कोणी वरील नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लघंन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असा इशाराही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आदेशात दिला आहे.
www.konkantoday.com