आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट, पण अध्यक्षांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न: ॲड. असिम सरोदे

0
29

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट निर्देश दिले आहेत, पण अध्यक्षांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी केला आहे. वरून काही सूचना आल्यामुळेच या प्रकरणात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात असावा असंही ते म्हणाले.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी आज संपली असून शिंदे गटाला कागदपत्रांसाठी आता आणखी एक आठवड्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विधानसभेमध्ये सुनावणीच्या कामकाजात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व निदर्शने स्पष्टपणे दिली असतानाही जाणूनबूजून विलंब लावण्याची आयडिया केली जात आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून आता कागदपत्रे मागवून घेण्यात आली आहेत. सतत काहीतरी कारणं देऊन हा प्रकार केला जात आहे. वरून काही सूचना आल्या असल्याने काहीजण असं करत असण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर गोष्टींना खतपाणी घालण्याचा हा प्रकार चुकीचा आहे.
ॲड. असिम सरोदे म्हणाले की, या संबंधित एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. कारण या सर्व याचिकांचा विषय एकच आहे. सगळ्या याचिका या एकत्रितपणे चालवण्यात याव्यात. कारण सगळ्या याचिकांतून मागणी तीच करण्यात आली आहे. काहीजणांनी पक्षाचा आदेश झुगारून बाहेर पडले आहेत. त्या लोकांना सर्वोच्च न्यायायलाने आधीच अपात्र ठरवले आहेत. आता राहुल नार्वेकरांनी फक्त त्याचं पालन करावं. पण यामध्ये काहीतरी कागदपत्रं मागून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिवसेनेचे कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे. कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र अध्यक्षांनी तूर्तास तरी दोन्ही गटांना आठवड्याचा अवधी दिला आहे.
शिवसेनेच्या पात्र-अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीला आज सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष विधानभवनात हजर राहण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या. या सुनावणीला शिंदे गटाचे 21 तर ठाकरे गटाचे 14 आमदार उपस्थित होते. सर्व याचिका स्वतंत्र आहेत, त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होईल, असं अध्यक्ष नार्वेकर सुनावणीदरम्यान म्हणाले. शिंदे गटाकडून निहार ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here