तीन कोटींची वीज चोरी उघडकीस;भरारी पथकाची कारवाई


मुंबई दि. १२ सप्टेंबर २०२३ : मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली असून हा वीज चोरीचा प्रकार पनवेल शहरात उघडकीस आला आहे.

पनवेल शहरातील भरारी पथकाच्या वतीने वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु असतांना बीएचरोड वरील दत्ता भोईर या उच्चदाब ग्राहकाच्या चिली हॉटेलची तपासणी केली असता भरारी पथकाला अनियमितता आढळून आली. या ग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटरची रिडींग रिव्हर्स करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ मधील तरतुदीनुसार ग्राहकाने वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत ही वीज चोरी सुमारे तीन कोटी रुपयांची असल्याचे आढळून आले. ग्राहकास वीज चोरी दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम न भरल्यास वीज कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचलिका स्वाती व्यवहारे व विभागाचे कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाकू रामदास मानवटकर, सहाय्यक अभियंता कुणाल पिंगळे, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी आकाश गौरकर व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही वीज चोरी विरुद्धची मोहीम यशस्वी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button