आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करायचा असेल तर तीन महिन्यात करा
भारतीय नागरिकांना केंद्र सरकारनं आणखी एक खूषखबर दिली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत १४ सप्टेंबरपर्यंत होती.आता १४ डिसेंबरपर्यंत नागरिकांना कोणतंही शुल्क न भरता आधार कार्ड अपडेट करता येईल.
UIDAI नं या संदर्भात निवदेन प्रसिद्ध केलं आहे. myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड करून आधारमधील माहिती विनामूल्य अद्ययावत करता येते. या दुरुस्ती व बदलासाठी १४ सप्टेंबर २०२३ ची मुदत देण्यात आली होती. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळं ही सुविधा आणखी ३ महिन्यांनी म्हणजेच, १५ सप्टेंबर २०२३ ते १४ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. https://myadhaar.uidai.gov.in/ या पोर्टलवर १४ डिसेंबर पर्यंत ही सुविधा विनामूल्य उपलब्ध असेल.
खरंतर, दहा वर्षांपूर्वी आधार काढलेल्या नागरिकांनीही आपलं आधार कार्ड अपडेट करावं असं आवाहन UIDAI नं केलं आहे. लोकसंख्येची अचूक माहिती मिळावी म्हणून आधार कार्ड अपडेट करावं. त्यासाठी ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा अपलोड करावा, असं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
https://myaadhaar.uidai.gov.in वर आधार फुकटात अपडेट करता येईल आणि ऑफलाइन अपडेटसाठी नेहमीप्रमाणे २५ रुपये आकारलं जाईल.