
जनरिक-सक्ती निर्णयात सुधारणा करा -जन आरोग्य अभियानाची मागणी
डॉक्टरांनी रुग्णाला औषधांचे प्रिस्क्रीप्शन जनरिक नावानेच द्यायला पाहिजे नाहीतर कारवाई करु” असा निर्देश डॉक्टर्स ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ने दिला होता.विरोध केल्यामुळे आरोग्य-मंत्रालयाच्या ‘सल्ल्या’वरुन २३ ऑगस्टला ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ने स्वत:च या नियमावावलीला स्थगिती दिली. ही माघार जनहिताची नाही. डॉक्टर्सनी तसेच आरोग्य-क्षेत्रातील जनवादीसंघटनांनी या माघारीला विरोध करावा, आदेश मागे न घेता त्यात सुधारणा करावी असे आवाहन जन आरोग्य अभियानाने केले आहे.
केमिस्टकडे जनतेला दर्जेदार, सुयोग्य किंमतीची औषधे मिळण्यासाठी काही किमान पाउले अधिक उशीर न करता सरकारने उचलावीत अशी मागणीही अभियानाने एका पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत बोलताना डॉ. अनंत फडके म्हणाले, जगभरच्या वैद्यकीय पुस्तकांमध्ये, नियतकालिकांमध्ये अशी जनरिक नावेच वापरली जातात. डॉक्टर्सचे सर्व शिक्षण जनरिक नावानेच झालेले असते. त्यामुळे जनरिक नावाने औषधे लिहून देणे हीच सार्वत्रिक पद्धत असली पाहिजे. पण भारतात कोणतीच औषध-कंपनी जनरिक नावाने दुकानांमध्ये ओषधे विकत नाही. पेटंट’चे संरक्षण असलेली नवीन औषधे संशोधक कंपनीने ठेवलेल्या ‘ब्रॅंड’ नावाने विकली जातात. पण पेटंटची मुदत संपलेल्या जुन्या औषधाना प्रत्येक कंपनी आपापले ‘ब्रॅंड नाव उर्फ टोपण नाव ठेवते. जनरिक नावाने केमिस्टकडे औषधे मिळतच नाहीत. एकच अपवाद – सरकारी योजनेतील ‘जन-औषधी’ नामक दुकानांच्यामध्ये जनरिक नावाने औषधे मिळतात. पण अशा दुकानांचे प्रमाण १% हून कमी आहे.
उत्पादन-खर्चाच्या मानाने ‘ब्रॅंडेड जनरिक’ औषधे पाचपट ते पंचवीसपट म्हणजे फारच महाग असतात. “इथे जनरिक औषधे मिळतील.” अशी पाटी लावलेल्या दुकानांमध्येही जनरिक-नावाने नव्हे तर थोडीशी स्वस्त ‘ब्रॅंडेड जनरिक’ औषधे विकतात. लोकांच्यामनात कमी किंमतीची औषधे म्हणजे जनरिक औषधे असे समीकरण बनले आहे पण खर तर तथाकथित ‘जनरिक औषधां’च्या वेष्टणावर फक्त जनरिक नाव नसते तर कमी प्रसिद्ध पावलेली ब्रॅंड-नावे असतात.
www.konkantoday.com