सांगली जिल्हात प्रथमच अपंग रक्षाबंधन सोहळा संपन्न ,धामणीच्या ग्रामपंचायत मध्ये अपंग व दिव्यांग महिलांनी चळवळीतील मान्यवरांना बांधल्या राख्या!
रक्षाबंधनच्या निमित्ताने धामणी ता तासगांव येथील ग्रामपंचायत मध्ये डोंगरसोनी, हातनूर व धामणी येथील अपंग ,विधवा व गृहिणी यांचे संयुक्त विद्यमाने व धामणीच्या विद्यमान सरपंच सौ.पुष्पाताई मंडले यांचे अध्यक्षतेखाली अपंग महिला रक्षाबंधन सोहळा पार पडला,
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष, व चळवळीचे नेते मा. शशिकांत डांगे, सुप्रसिद्ध लेखक, समान पाणी वाटप चळवळीचे तासगाव तालुक्याचे नेते व व्याख्याते अॅड मा.कृष्णा पाटील साहेब, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तासगांव तालुका अध्यक्ष मा. विकास डावरे तर मुख्य अतिथी स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री अमोल कदम, व स्वराज्य पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष मा प्रमोद पाटील हे उपस्थित होते, यावेळी अपंग व दिव्यांग महिलांनी उपस्थित मान्यवरांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला,
यावेळी “ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न , या विषयावर वक्त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं,
यावेळी बोलताना शशिकांत डांगे यांनी अपंग व विधवा महिलांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात आम्ही चळवळीच्या, आंदोलनाच्या रुपाने बांधील राहू, हे रक्षाबंधन विचारांचे, स्वाभिमानाचे व अनेकाना प्रेरणा देणारे ठरेल असे मत व्यक्त त्यानी केले तर अॅड .कृष्णा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की महिलांनी पुढाकार घेवून स्वतःला भविष्यात पुरुष प्रधान संस्कृतीला मी कुठे कमी नाही हे दाखवून दिलं पाहिजे, आणि परंपरेनं जखडून ठेवलेल्या जोखडातून मुक्त झालं पाहिजे, आजची स्त्री जरी शिकली तरी ती जोखडातून मुक्त होत नाही हि एक समाजाची शोकांतिका आहे असं त्यांनी मत व्यक्त केले आहे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तासगाव तालुका अध्यक्ष विकास डावरे यांनी अपंग महिलांनी स्वतः अपंग आहोत असं समजून न जाता अपंगत्वावर मात करणं गरजेचं असून सरकारच्या अपंगांना मिळणा-या हजार रुपये पेन्शन मध्ये गॅसचा सिलेंडर सुध्दा येत नाही तर अपंग बंधू भगिनी किंवा देशातील अपंग कसे जगत असतील याचा सरकार कधी विचार करणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारला पेन्शन वाढवावी लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं,
या कार्यक्रमास अपंग संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुरेखा शिंदे , डोंगरसोनीच्या अपंग महिला, हातनूरच्या अपंग महिला व धामणी गावांतील अनेक नागरीक उपस्थित होते,
या कार्यक्रमाची प्रस्तावना धामणी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. आनंदराव पाटील यांनी केली तर आभार धामणीच्या विद्यमान सरपंच सौ. पुष्पाताई मंडले यांनी मानले.