पत्रकार कॉलनीजवळच्या नाल्यात कचरा, दुर्गंधीचा त्रास, मोकाट जनावरांचा उपद्रवही वाढला, घंटागाडीचा प्रस्ताव पाठवा पालकमंत्र्यांचे आदेश
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्या खूपच गंभीर बनली आहे. उत्कर्ष नगर मधील पत्रकार कॉलनी जवळ असलेल्या नाल्यात उत्कर्ष नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व कचरा आणून टाकला जातं आहे. परिणामी पत्रकार सोसायटी आणि परिसरातील अन्य सोसायट्या याना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास होत आहे. कचऱ्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आला आहे. तसेच मोकाट श्वान आणि गुरे यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी करणारे निवेदन पत्रकार कॉलनीतील ग्रामस्थानी जिल्ह्याचे राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांना रविवारी दिले. कचरा निर्मूलन प्रश्न अती तातडीने मार्गी लावावा अशी मागणी केली. ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन ना. सामंत यांनी ग्रामस्थांना दिले.
घंटा गाडीसाठी प्रस्ताव पाठवा : सामंत
याबाबत कुवारबाव ग्रामपंचायत उपसरपंच याना पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सूचना दिल्या की तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या निधीतून कचरा संकलनासाठी घंटा गाड्या दिल्या आहेत. निधी उपलब्ध आहे त्यामुळे कूवारबाव ग्रामपंचायतीने तातडीने तसा प्रस्ताव पाठवावा. आता पालकमंत्र्यांच्या निर्देशांचे पालन केले जाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रविवारी प्रादेशिक नळपाणी योजनेच्या जल साठवण टाकीचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार कॉलनीतील नागरिकांनी कचरा समस्येबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना हे निवेदन दिले. यावेळी पत्रकार कॉलनीतील श्री. प्रभाकर कासेकर, सौ. सुषमा प्रभाकर कासेकर, प्रकाश वराडकर, सौ. नेहा अतिक पाटणकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com