म्हणून सांस्कृतिक केंद्राच्या छतावर प्लास्टिक,-मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा खुलासा
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या छतावरील पत्रे खराब झाले आहेत.ते बदलणे गरजेचे आहे. पावसाळ्यात गळती लागू नये म्हणून तात्पुरती उपाययोजना करताना छतावर प्लास्टिक टाकलेले आहे. सांस्कृतिक केंद्राच्या कामाची कोणीही बदनामी करू नये, असे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिंगटे म्हणाले, ‘अनेक वर्षे हे सांस्कृतिक केंद्र बंद होते. यामुळे येथील नाट्यचळवळ पूर्णपणे थांबली होती. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन सांस्कृतिक केंद्रातील उर्वरित काम पूर्ण केले आणि सांस्कृतिक केंद्र रसिकांच्या सेवेत रूजू केले. आता सांस्कृतिक केंद्रावर प्लास्टिक टाकले म्हणून पुन्हा याबाबत ओरड होऊ लागली आहे. मुळात हे काम २०१५ ते २०१७ या कालावधीत झाले आहे. याची वस्तुस्थिती समजून घ्यावी, सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी पालकमंत्र्यांनी जो अडीच कोटींचा निधी मंजूर केला. त्यामधून एसी, फ्लोअर अशी महत्वाची कामे केली गेली. सांस्कृतिक केंद्रावरील पत्रे खराब झाले आहेत हे लक्षात आले; परंतु अत्यावश्यक कामे केली नसती तर सांस्कृतिक केंद्र सुरू झाले नसते. सांस्कृतिक केंद्रावरील पत्रे बदलण्यासाठी ५० ते ६० लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. पत्रे खराब झाल्यामुळे गळती होऊन एसी, लाईट, ध्वनी या तांत्रिक गोष्टी खराब होऊ नयेत, यासाठी प्लास्टिकचा कागद आम्ही टाकला यात आमचे काय चुकले, असे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनीसांगितले.
सांस्कृतिक केंद्राबाबत इनायत मुकादम व अन्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्याची चौकशी सुरू राहील; परंतु सुरू झालेले सांस्कृतिक केंद्र पुन्हा बंद पाडण्याचे पाप करू नये, अशी अपेक्षा काही ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com