रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही-बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई गोवा रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही असा इशारा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे
मुंबई-गोवा महामार्गाच्या १२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे; मात्र तरीही निधी व अन्य काही कारणे देत महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाच्या या पूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, असा दमही मंत्री चव्हाण यांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी खुली करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गाच्या रस्तेकामाच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले आहे. निधीची कमतरता नसतानाही तरीही काम का पूर्ण होत नाही, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न व त्यावर उपाय या विषयी कोकणवासीयांबरोबर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी डोंबिवली जिमखाना-मुंबई येथे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.कोकण विभागातून आलेल्या नागरिकांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. महामार्ग रस्ता प्रकल्प का रखडला या विषयी चर्चा करण्याऐवजी आता कोकणातील मंडळींनी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. संघटितपणे हा महत्वपूर्ण रस्ता पूर्ण होण्यासाठी शासनाला साथ दिली तर महामार्गाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल. महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना खुली केली जाईल, असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला
www.konkantoday.com