वृद्ध महिलेला गाडीत बसवून सोन्याचा दागिना जबरदस्तीने चोरणाऱ्या दरोडेखोर टोळक्याला अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडले

वृद्ध महिलेला गाडीत बसवून सोन्याचा दागिना जबरदस्तीने चोरणाऱ्या दरोडेखोर टोळक्याला अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना आज घडली आहे
दिनांक 26/07/२०२३ रोजी सकाळी 09.00 वा. अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक मधील असणाऱ्या आपल्या खात्यामधील फॅमिली पेंशनची काही रक्कम काढण्याकसाठी मुंढे, चिपळूण येथील राहणाऱ्या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला आपल्या वाडीतील राहणाऱ्या अन्य एका जेष्ठ नागरिक महिले सोबत मुंढे एस.टी. स्टॉप वर शिरगांवला जाण्यासाठी वाट पहात असताना एक पोपटी (हिरव्या) रंगाची कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली व गाडी मधील बसलेल्या चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले व गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून सोबत असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेस गाडी मध्ये घेतले नाही व काही अंतरावर गेल्यावर गाडी मधील बसलेल्या एका महिलेने तसेच एका इसमाने त्यांच्या गळ्यातील ₹93500/- किंमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन व मारहाण करून हिसकावून घेण्यात आली तसेच शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना गाडीतून खाली उतरविण्यात आले.
मुंढे, चिपळूण येथे राहणाऱ्या या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेने लागलीच मागून येणाऱ्या एस.टी. बस ने अलोरे शिरगांव पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर 1657 असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलीसांना सांगितले.
या मिळालेल्या माहितीच्या आधारे अलोरे पोलीसांमार्फत लागलीच नाकाबंदी करण्यात आली व या गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने गाडी व गाडीतील सर्वांना पकडण्यात आले.
गाडीमधील असणाऱ्या 1) सूरज समाधान काळे, वय 21 रा. कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद, 2) सरस्वती सूरज काळे, वय 21 कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद, 3) राहुल अनिल शिंदे, वय 35 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर व 4) कामिनी राहुल शिंदे, वय 32 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर या चारही जणांना त्यांच्या Chevrolet Beat गाडी क्रमांक MH-12-HN-1657 सह ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या विरुद्ध अलोरे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 50/2023 भा.द.वि. संहिता कलम 394, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दखल करण्यात आला व दि. 26/07/2023 रोजी 18.18 वा अटक करण्यात आलेली आहे.
गुन्ह्यातील जबरीने चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, नमूद आरोपी हे गुन्हा करण्यासाठी पोपटी रंगाची Chevrolet Beat कार क्रमांक MH-12-HN-1657 चा अथवा अन्य वाहनाचा वापर करत असून ते पायी चालत जाणारे व ज्यांचे गळ्यात सोन्याचे दागिने आहेत अश्या जेष्ठ नागरिकांना विशेषतः जेष्ठ महिलांना हेरून त्यांना स्वतःहून लिफ्ट देऊन कारमध्ये बसण्यास सांगतात व प्रवासा दरम्याने त्यांना बोलण्यात गुंतवून तसेच “तुमच्यामुळे कारमध्ये गर्दी झाली आहे, इकडे सरका-तिकडे सरका, हात वर करा” असे बोलून लक्ष विचलित करून हातचलाखीने गळ्यातील सोन्याचे दागिने चोरतात व लिफ्ट दिलेल्या नागरिकांस मधेच रस्त्यात उतरून निघून जातात.
नजीकच्या काळात नमूद आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यात व अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का? या बाबत अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सपोनि. श्री सुजीत गडदे, अलोरे शिरगांव पोलीस ठाणे,
पोहवा श्री. गणेश नाळे,
पोशि श्री. राहुल देशमुख व
महिला होमगार्ड श्रीमती. विजया चिपळूणकर. आदींनीही कामगिरी यशस्वी पार पाडली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button