मुंबई-गोवा महामार्गाच्या तुलनेत रत्नागिरी ते कोल्हापूर टप्प्याचे काम अधिक वेगाने होणार
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रत्नागिरी ते दख्खन या ५५ किलोमीटरच्या टप्प्यातील काँक्रिटीकरणाच्या कामाला वेगाने सुरवात झाली आहे. नियोजनबद्ध काम सुरू झाले असून माती टाकून काही ठिकाणी काँक्रिटचा पहिला थरही टाकण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या तुलनेत रत्नागिरी ते कोल्हापूर टप्प्याचे काम अधिक वेगाने होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. तीन महिन्यांपूर्वी पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यातील कामाचे केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यावेळी हा मार्ग वेगाने पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते. रत्नागिरी ते कोल्हापूर अशा १२५ किमीचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. त्यामधील रत्नागिरी ते दख्खन या ५५ किमीचे काम राजस्थानच्या रवी इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. त्यापुढील टप्पा दख्खन ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक असा आहे. रत्नागिरी ते दख्खनसाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. सध्या या कामाला वेगाने सुरवात झाली असून दीड महिन्यात काही टप्प्यात कॉक्रिटचा पहिला थरही टाकण्यात आला आहे. नियोजनबद्ध काम सुरू असल्यामुळे ते वेळेत पूर्ण होईल असा विश्वास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
www.konkantoday.com