
नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघेही कामाला वाघ आहेत-राज ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहावं, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीकडे लक्ष देण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. दोघांनीही राज ठाकरेंवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत त्यांच्या प्रश्नांचे चेंडू सीमेपार टोलवले.
तुमचे महाराष्ट्रातील आवडते मुख्यमंत्री कोण?, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे आताच मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून ठसा उमटवायला वेळ लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जर समजा प्रभावशाली मुख्यमंत्री पाहिले असतील, ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना देखील प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. मनोहर जोशींच्या काळामध्ये मनोहर जोशींनी आब राखली, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण कामाचा झपाटा जर बघितला तर ते म्हणजे नारायण राणे, असं राज ठाकरेंनी सांगितले.राज ठाकरेंना यावेळी तुमचे आवडते नेते कोण?, पंतप्रधान नरेंद्र मोदी कि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. यावर तसं फार कोण नाही. याचं कारण म्हणजे मी लहानपणापासून आदराने पाहत आलो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणता नेता आवडतो, यापेक्षा मी दोघांच्या कामाची तुलना करु शकले, असं राज ठाकरेंनी सांगितलं. दोघांमध्ये जर बघायला गेलो तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघेही कामाला वाघ आहेत, असं कौतुक राज ठाकरेंनी केलं. राजकीय एखादी भूमिका मला न आवडणं, मला न पटणं हे स्वभाविक आहे. याच्यासाठी आपण त्या व्यक्तींवर फुल्ली मारत नाही. मी ज्यावेळी नरेंद्र मोदींवर देखील टीका करत होते, ती टीका नरेंद्र मोदींवर केलेली नाही, तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर केली होती, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com