रत्नागिरी : कोव्हीडने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाने 50 हजारांचे अनुदान जाहीर केले. जवळपास 80 ते 90 टक्के लाभार्थ्यांना हे अनुदान मिळाले, मात्र महिनाहून अधिक काळ या वेबसाईट संथगतीने सुरु असल्याने तब्बल 120 लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नसून या महिन्याभरात याचे 100 टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोव्हीड सानुग्रह अनुदान वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी या महिनाभरात प्रकर्षाने समोर आल्यानंतर याविषयी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता वेबसाईट संथ गतीने सुरु होते, त्यामुळे माहिती अपलोड करण्यात अडचणी निर्माण झाल्या आता या आठवड्यात ही तांत्रिक अडचण दूर झाली असून या महिनाभरात कोव्हीड सानुग्रह अनुदान वाटप 100 टक्के पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
त्याचप्रमाणे काही लाभार्थ्यांच्या कुटुंबियांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानेही लाभ देण्यात आला नव्हता. ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे अशांना वेळेत अनुदान देण्यात आले आहे. अद्याप 120 कुटुंबियांना याचा लाभ मिळाला नाही. महिनाभरात याही कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवत होत्या, आता ही तांत्रिक अडचणी दुर झाली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.