माणगाव येथील लाकुडतोड्याचा खेडमध्ये खून; आंबवली – वरवलीच्या जंगलातील घटना, एक महिन्याने उलगडा
खेड : जंगलात लाकूडतोडीसाठी माणगाव येथून आलेल्या एका कामगाराचा त्याच्याच एका सहकाऱ्याने खून केल्याची घटना उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक मृतदेह आंबवली – वरवली नजीकच्या जंगलमय भागात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी रविवारी दि.२९ रोजी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
खेड तालुक्यातील आंबवली – वरवली या दोन गावांमध्ये सुमारे महिना भरापूर्वी जंगलमय भागात लाकूडतोड चालू होती. त्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथून कामगार मागवले होते. दि. २६ डिसेंबर रोजी जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघा जणांमध्ये वाद झाला. त्यापैकी एका कामगाराचा मारहाणीत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह जंगलात टाकून इतर कामगार निघून गेले होते. दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्यानंतर खेड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच मृत इसम कोण आहे, याचा उलगडा झाला. मंगेश गायकवाड असे मृत कामगाराचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित खुन्याला पकडण्यासाठी खेड पोलिसांचे पथक रवाना झाले असून संशयित आरोपिंचा शोध सुरू झाला आहे.