मनरेगा कर्मचाऱ्यांचे 1 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन
रत्नागिरी : पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन मिळावे, आकृतीबंधामध्ये समायोजन करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले असून 1 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कंत्राटी तत्वावर मागील 10 ते 12 वर्षापासून अखंडित कामे करीत आहोत. वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडली आहे. वेळेवर कामे पूर्ण करीत आहोत. कोव्हिड 19 कालावधीत सुद्धा नियमित कार्यरत राहून काम केले. सुरक्षिततेसाठी कोणतीही शासकीय योजना नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मागील तीन ते चार वर्षापासून आम्हा कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची तयारी संघटनेने केली असल्याची कैफीयत निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
काही कंत्राटी कर्मचार्यांना राज्य निधी असोसिएशनमधून मानधन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मानधन व नियुक्ती देण्यात यावी. गेल्या आर्थिक वर्षात पीएम आणि एमआयएस यांचे मानधन 14 ते 15 हजार रुपयांनी वाढले आहे. मात्र, आमच्या कंत्राटी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करावे. मनरेगा कर्मचार्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.