जुनी पेन्शन हक्कासाठी कोकण भवनात घोषणाबाजी

नवी मुंबई : ‘मी शपथ घेतो की, मला पेन्शन नाकारणाऱ्या पक्षाला मी मत देणार नाही. जर पेन्शन देऊ शकत नसेल तर, मी माझे कुटुंबिय आणि मित्रपरिवार यांच्यावतीने त्या पक्षाला अजिबात मत देणार नाही. आता माझेही ठरले आहे. आणि आजपासून शपथ घेतो की, जुन्या पेन्‍शनचा प्रचार आणि प्रसारही करील. जो पेन्शन देईल त्यालाच मत देईल.’ अशी प्रतिज्ञा घेऊन, जुनी पेन्शन हक्कासाठी आज कोकण भवनमध्ये जुनी पेन्शन हक्क समितीमार्फत घोषणा देण्यात आल्या.
कोकण भवन इमारतीच्या आवारात जुनी पेन्शन हक्क समिती, कोकण विभागाच्या अध्यक्षा तथा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई वंदना कोचुरे यांनी कोकण भवनात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर राज्य शासकीय कार्मचाऱ्यांनी जाहीर केलेले शपथपत्र वाचून शपथ घेतली. यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाचे सचिव डॉ. गणेश धुमाळ, समितीचे सचिव तथा माजी सैनिक संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष अजित न्यायनिर्गुणे, सहसचिव अपर्णा गायकवाड, समितीचे कोषाध्यक्ष विनोद वैदू, बृहन्मुंबई राज्य शासकीय संघटनेचे मोरेश्वर चौधरी, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघनेच्या जनाबाई साळवे, विद्युत विभाग कर्मचारी संघटनेचे चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
राज्य मंत्रीमंडळाने ऑक्टोबर 2005 रोजी बैठकीत निर्णय घेऊन 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द केली. आणि नवीन डीसीपीएस योजना लागू केली. ही योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य भरातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांमार्फत करण्यात येत आहे. नव्या डीसीपीएस योजनेबाबत कोणताही प्रस्ताव सभागृहात पारीत झालेला नाही. अंशदायी पेन्शन योजना जबरदस्तीने थोपविण्यात येत आहे. या योजनेच्या सक्तीमुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ही आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांचे पडसाद आज कोकण भवनात पहायला मिळाले. कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन हक्क समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षा तथा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई वंदना कोचुरे यांनी आज कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत जुनी पेन्शन न देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ घेऊन जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी घोषणाबाजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button