भावकीतील वादातून बावीस वर्षीय तरुणीचा खून करणाऱ्याला पोलिस कोठडी; मृत साक्षीवर अंत्यसंस्कार
राजापूर : भावकीतील वादातून बावीस वर्षीय तरुणीचा खून करणारा संशयित आरोपी विनायक शंकर गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 19 जानेवारी रोजी त्याला येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला 24 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या साक्षीवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्याला हादरवणारी घटना बुधवारी तालुक्यातील भालावली येथे घडली. गावातील जमीन जुमला तसेच भावकीतील वादातून हल्लेखोर विनायक शंकर गुरव याने साक्षी मुकुंद गुरव आणि सिध्दी शंकर गुरव यांच्यावर दांडक्याने हल्ला केला होता. त्यामध्ये साक्षी जागीच मृत्युमुखी पडली तर सिध्दी गंभीर जखमी झाली होती. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी संशयित हल्लेखोर विनायक याचा पाठलाग करून ताब्यात घेतले होते.
संशयित आरोपी आणि दुसर्या गटात भावकीतून वाद सुरू होता. यामध्ये सोयर-सूतक न पाळणे, देवस्थानचा दास्तान संशयित आरोपी आणि त्याच्या गटास न मिळणे, सुरू असलेल्या घराच्या बांधकामाला मिळालेली स्थगिती अशा काही घटना या वादासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. त्यातून धमक्या देखील देण्यात आल्या होत्या, अशीही माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अखेर त्या वादातून साक्षीचा खून
झाला.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या साक्षीच्या मानेसह डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो साक्षीच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्या हल्ल्यात जखमी झालेली दुसरी तरुणी सिध्दी हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.