वेळवी येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामास खो
दापोली तालुक्यातील वेळवी येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामास खीळ बसणार आहे. जागा मालक यांनी काम थांबविण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग दापोली, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, ग्राम पंचायत वेळवी यांना वकिलामार्फत नोटीस दिली आहे. त्याची एक प्रत विद्यमान आमदार यांना देखील दिली असल्याची माहिती दापोली जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग यांच्याकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील वेळवी येथे वेळवी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू असलेल्या आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम हे 1 कोटी 43 लाख इतक्या रकमेचे असून अभिषेक विचारे हे या कामाचे ठेकेदार आहेत. हे काम स्लॅब लेव्हलपर्यंत झाले असून या कामावर 15 लाख इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आहे.2021 रोजी हे काम सुरू झाले असून हे काम आता दायित्वमध्ये गेले आहे. या इमारतीचे काम हे जागा मालकांनी दिलेल्या बक्षिसपत्र जागेव्यतिरिक्त करण्यात आले आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. हे काम जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत सुरू असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग दापोली यांच्याकडून सांगण्यात आले.