
रंगरंगोटी करून तयार केले पट्टेरी वाघाचे बनावट कातडे; अहवालात बिंग फुटले
चिपळूण : पट्टेरी वाघाचे कातडे रामपूर परिसरात तस्करीसाठी आणलेल्या तिघांना एटीएसच्या अधिकार्यांनी अटक केली होती. हे कातडे बनावट असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून आला आहे. त्यामुळे या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. घोणसरे-चिवेली फाटा येथे तस्करीसाठी आलेल्या हेमंत भिकू रामाणे (46, रा. आड, ता. म्हसळा, रायगड), दिनेश लक्ष्मण तांबीटकर (48, रा. बामणोली, ता. चिपळूण), आशितोष मुकुंद धारसे (22, रा. मोटवली, ता. महाड-रायगड) यांना पोलिस व वन विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती. हे कातडे बनावट असल्याचा संशय वन विभागाला होता. यामुळे अधिक तपासणीसाठी हे कातडे पुण्यात पाठविण्यात आले होते. हे कातडे बनावट असल्याचा अहवाल आला असून हे कातडे रंगरंगोटी करून तयार केल्याचे उघड झाले आहे.