मारळ येथे भरली श्री देव मार्लेश्वराची यात्रा
संगमेश्वर : स्वयंभू श्री देव मार्लेश्वरची वार्षिक यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात मारळ येथे झाली. या यात्रेदरम्यान भाविक व यात्रेकरूंनी मार्लेश्वर, गिरिजादेवी व व्याडेश्वर पालख्यांचे दर्शन घेतले. मार्लेश्वर व गिरिजादेवीचा विवाहसोहळा रविवारी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडल्यानंतर तीनही पालख्यांचा रविवारी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मुक्काम होता. रात्री साक्षीविडे भरण्यात आले. सोमवारी सकाळी या पालख्या मार्लेश्वर शिखरावरून काही अंतराने मार्गस्थ झाल्या. व्याडेश्वराची पालखी देवरूखकडे, गिरिजादेवीची पालखी साखरप्याकडे तर मार्लेश्वरची पालखी आंगवली येथे घरोघरी दर्शनासाठी रवाना झाली. या पालख्यांचे मारळनगरीत स्वागत करून पूजाअर्चा करण्यात आली. यानंतर या पालख्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या.