वाटद येथील जमिनी बळकावण्याचा आरोप असणार्या कोतवालाची तहसीलदारांनी केली बदली
रत्नागिरी : वाटद येथील वादग्रस्त कोतवाल दीपक लक्ष्मण गमरे यांची जयगड येथे बदलीचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले असून, शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. काही जमिनींना स्वतःचे नाव कूळ म्हणून लावणे, तर काही जमिनींची तलाठी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्या संगनमताने तुकड पाडल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. त्यानुसार कोतवाल गमरे यांनी कुळ कायद्याने किती जमिनी व कशा प्रकारे घेतल्या आहेत? त्याची माहिती मिळावी व त्यांच्या संबंधित ज्या विभागाने वेळोवेळी दिलेले आदेश आहेत, संमत्तीपत्रे, प्रतिज्ञापत्रे, सहिसूद नक्कल, वारस हक्काने, खरेदी खताने जमिनी कधी व कशा घेतल्या? याचीही माहिती या चौकशीतून व्हावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली होती. या प्रकरणात तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला आहे. तहसीलदार जाधव यांनी त्याची बदली केली आहे.
गमरे हे वाटद-खंडाळा येथील तलाठी कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत असताना जमिनी बळकाविण्याचे काम केल्याची तक्रार वाटद गावातील जगन्नाथ शितप, अनिल बलेकर, विश्वास शितप, इक्बाल पांगारकर यांच्यासह सहहिस्सेदारांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. अर्जदार हे शेतकरी असून ते पूर्वापार काळापासून या जमिनी कसत आहेत. त्यामध्ये ते भातशेती, नाचणी, काजू, आंबा व पारंपरिक शेती करीत आहेेत. याठिकाणी वहिवाट दाखवण्याचा गमरे यांचा काहीही संबंध नसताना देखील त्यांनी येथे वहिवाट जाणीवपूर्वक दाखविली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.