
प्लास्टिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींना सव्वादोन कोटींचा निधी
रत्नागिरी : प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करण्यात येणार असून कोट्यवधी रुपये या गावांसाठी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून एक ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ग्रामपंचायतीत संकलन आणि प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी एका ग्रामपंचायतीला 25 लाखांप्रमाणे सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले असून त्याला प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे. आबलोली ग्रामपंचायत (गुहागर), कुंबळे (मंडणगड), हर्णै (दापोली), खेर्डी (चिपळूण), साडवली (संगमेश्वर), नाचणे (रत्नागिरी), वेरवली (लांजा), कोदवली (राजापूर) या ग्रामपंचायतीत प्रकल्प उभारले जातील. खेड तालुक्यात दोन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले असून आठ दिवसात त्यावर निर्णय होणार आहे.
प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा क्लस्टर असतील. प्रकल्पासाठी 25 लाखाचा खर्च अपेक्षित असून 16 लाख स्वच्छ भारत मिशनमधून तर उर्वरित निधी पंधरा वित्त आयोग किंवा स्वनिधीतून ग्रामपंचायतीला देणार आहे. या प्रकल्पामुळे प्लास्टिक कचरामुक्त गावे बनण्यास मदत होणार आहे. प्रकल्पासाठी नऊपैकी आठ जागा निश्चित असून 24 लाख 95 हजार 917 रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्वरित निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.