माजी मंत्री अॅड. अनिल परब यांना ईडीचा दणका
रत्नागिरी : माजी मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झटका दिला आहे. ईडीकडून अॅड. अनिल परब यांच्याशी निगडित असणारी 10 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ‘मनी लॉन्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्या नंतर बुधवारी ईडीकडून ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या कारवाईसंदर्भात एक ट्विट देखील केले आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि जमीन अशी 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉड्रिगं प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. साई रिसॉर्ट ही मालमता माझी नाही तर ती सदानंद कदम यांची आहे, असे अॅड. अनिल परब यांनी वारंवार सांगितले असून हा विषय न्यायप्रविष्ट आहे, असे देखील सांगितले आहे.