
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश
रत्नागिरी : राज्य शासनाच्या महत्वाकांशी अशा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात वित्त सहाय्य यंत्रणा म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत वित्त सहाय्यासाठी तीन प्रमुख बदल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. राज्यातील सूक्ष्म व लघु औद्योगिक उपक्रमांच्या स्थापनेस चालना देणेसाठी तसेच नव्याने स्थापन होणा-या उद्योगांना अनुदानावर आधारीत कर्जाचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट, 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यभरात लागू केली आहे.
प्रत्येक जिल्हयातील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय व खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय यांचेकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सर्व राष्ट्रीयीकृत बँका, निवडक खाजगी व सहकारी बँक तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये 11 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये काही बदल केले असून यामध्ये प्रामुख्याने तीन बदलांचा समावेश आहे.
पहिल्या प्रमुख बदलांतर्गत सेवा क्षेत्रासाठी प्रकल्प मर्यादा 10 लाख रुपयांवरुन 20 लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. दुसर्या बदलान्वये इतर मागासवर्ग तसेच विमुक्त व भटक्या जमाती आणि अल्पसंख्याक यांचा विशेष प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवर्गातील लाभार्थ्यांना आता विशेष प्रवर्गासाठी अनुज्ञेय अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. तिसर्या प्रमुख बदलांतर्गत राज्यातील निवडक जिल्हा सहकारी बँकांचा समावेश या योजने अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे. यानुसार योजनेच्या पोर्टलवरही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांनी वर नमूद सर्व बदलांचा लाभ घेणेचे दृष्टीने आपले कर्जप्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रांसह योजनेचे संकेतस्थळावर दाखल करावेत. तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेचा योजनेमध्ये समावेश झाला असल्याने उपलब्ध झालेल्या पर्यायांचा विचार करुन कर्जप्रस्ताव सादर करताना उचित बँक शाखेची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.