
अमली पदार्थ सेवन प्रकरणी पेठकिल्ल्यातील एकाला दंड
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे तीन ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ स्वतःजवळ बाळगून त्याचे सेवन करणार्या आरोपीला न्यायालयाने सोमवार 2 जानेवारी रोजी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शहबाज मुबारक हकीम (वय 22, मुळ रा.लांजा बाजारपेठ सध्या रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.15 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री शहर पोलिस मिरकरवाडा येथे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना मलबारी जेटी येथे एक तरुण गांजा ओढत असताना दिसून आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतल्यावर त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 3 ग्रॅम गांजा मिळून आला होता. तो गांजा त्याने कुठून आणला असे पोलिसांनी विचारल्यावर एका अनोळखी खलाशाकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणी शयबाज विरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍड. प्रज्ञा तिवरेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून रत्नागिरी न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी शहबाज हकिमला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तपासिक अंमलदार म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दीपराज पाटील यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत, महिला पोलिस हेड काँस्टेबल साळवी, लिंगायत यांनी काम पाहिले.