मांडवी समुद्र किनारी वकिलावर प्राणघातक हल्ला. तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण.

रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी कल्पेश रविंद्र जाधव (वय 27, थियटर रोड, रत्नागिरी, मूळ – नाखरे) यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ते आपल्या दुचाकी (MH08 AY 2683) वर मांडवी समुद्र किनारी बसले होते.

त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ‘गांजा आहे का?’ अशी त्रास देण्याच्या हेतूने विचारणा केली व ॲड. जाधव बेसावध असताना त्यापैकी एकाने त्यांची मान दाबून ढोपराखाली दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तोंडात वाळू कोंबून जीव गुदमरवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. तिन्ही इसमांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले.

फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनानुसार, आरोपींपैकी एक जण मजबूत शरीरयष्टीचा असून त्याने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि थ्री फोर्थ पॅंट परिधान केले होते. दुसरा इसम मध्यम शरीरयष्टीचा, तर तिसरा सडपातळ होता.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र दिनकर पालांडे हे तपास करत आहेत. भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस), 2023 अधिनियम कलम 118 (1), 115 (2), 125, 324 (4), 352, 3 (5) नुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवी सारख्या पर्यटन स्थळांवर अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्य घडताना पाहून रत्नागिरीकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button