नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने नाणीज येथे बांधले वनराई बंधारे; जि.प.च्या सीईओंनी केले कौतुक
नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने नाणीज येथे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमाचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कौतुक केले.
कोकणात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. सारे ओहोळ, ओढे, पाण्याचे प्रवाह कोरडे असतात. अशावेळी वनराई बंधारे उपयोगी पडतात. आता डिसेंबर, जानेवारीमध्ये ओढ्यात थोडे पाणी असते. अशावेळी हे बंधारे बांधले तर त्यात पाणी साठते. ते पाणी त्या गावाला वा वस्तीला उन्हाळ्यात उपयोगाला येते. त्यातून त्या भागाची पाण्याची गरज भागते.
लोकांची ही पाण्याची गरज ओळखून स्वस्वरूप सांप्रदायाच्या जिल्हा सेवा समितीच्यावतीने सामाजिक उपक्रमांतर्गत वनराई बंधारे बांधण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून संस्थानतर्फे हे कार्य सुरू असते. बंधारा बांधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळी 10 वाजता धर्मक्षेत्र प्रमुख दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व परमपूज्य माउलीच्या नामगजराने क्रमाची सुरुवात झाली.
जिल्ह्यातून 200 भक्तगण बंधारा बांधण्यासाठी उपस्थित होते. दिवसभर उन्हातान्हात हे कष्टाचे काम सर्व भाविक उत्साहाने करत होते. या उपक्रमासाठी संस्थानाचे सीईओ विनोद भागवत , जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, जिल्हा सेवाध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, सचिव महेंद्र कदम, जिल्हा शिबीर प्रमुख ईशाली जागुष्ठे, खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुका अध्यक्ष, तालुक्यातील सर्व भक्तगण, सर्व आजी-माजी पदाधिकारी, उपस्थित होते.