रुग्णालयात गर्दी करू नका असे सांगितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण
रत्नागिरी : रुग्णालयात गर्दी करू नका असे सांगितल्याच्या रागातून वृद्धाला फाईटने आणि लाथांनी मारहाण केल्याची घटना सोमवार 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वा. सुमारास रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी महिताप अब्दुल हमीद साखरकर (रा. शिरगाव, रत्नागिरी ) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इम्तियाज अब्दुल सत्तार पटेल (वय 62, रा. रहेबार मोहल्ला साखरतर, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. इम्तियाज पटेल यांचे नातेवाईक अन्वर पटेल यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन सिटीस्कॅन करण्यासाठी चिरायू हॉस्पिटलमद्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पटेल यांच्या अन्य नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पाहून इम्तियाज पटेल यांनी गर्दी कमी करा असे त्यांना सांगितले. यावेळी साखरकरने इम्तियाज पटेल यांची कॉलर पकडून मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.