ना. सामंतांनी आदेश दिले, अधिकार्यांनी पाहणी केली पण भाट्ये खाडीतील गाळ उपसणार कधी?
रत्नागिरी : शहराजवळील राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. तो गाळाने भरलेला आहे. तसेच या मार्गात खडकही तयार झाल्याने मच्छिमारांसाठी धोकादायक ठरत आहेत. या गाळामुळे अनेक बोटींचे अपघात होऊन खलाशी दगावले आहेत. तसेच बोटींचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे सुरू आहे. भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरात साचलेला गाळ तातडीने उपसण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित खात्याला दिले होते. त्यानंतर पत्तन विभाग, मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. मात्र, गाळ कधी उपसणार? असा प्रश्न मच्छिमारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत जनता दरबारातही पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे गाळाच्या प्रश्नाबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने न्याय मागितला होता. त्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी पाहणी केली होती. दरम्यान, पाहणी करून बरेच दिवस उलटल्यानंतरही अद्याप पत्तन विभाग तसेच मेरिटाईम बोर्डाकडून गाळ उपसण्याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नसल्याने मच्छिमारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गाळ काढल्यास पुढील मासेमारी मोसमात हा मासेमारीसाठी एकमेव मार्ग असलेला बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने मच्छीमार हैराण झाले
आहेत.
हा गाळ कधी उपसणार? असा प्रश्न मच्छिमारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र मच्छीमार संघर्ष समिती हा गाळ उपसण्यात यावा, यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत. मात्र, या गाळाचा प्रश्न लवकरच मार्गी न लागल्यास मच्छीमार आंदोलनाच्या तयारीत आहेत.