रत्नागिरीत जैन बांधवांचा काळ्या फिती लावून मूक मोर्चा; दुकानेही ठेवली बंद

रत्नागिरी : रत्नागिरीतील सकल जैन समाजाने गुरुवारी मूक मोर्चा काढून  पालिताणा (सौराष्ट्र, गुजरात) येथे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेविरोधात निषेध नोंदवला. तसेच जैन समाजाची सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. या कालावधीत सर्व जैन बांधवांनी काळ्या फिती लावून मोर्चेकर्‍यांनी निषेध केला. मूक मोर्चानंतर जैन बांधवांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
श्री जैन श्वेतांबरमूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी संघ आणि श्री दिगंबर जैन मंडळातर्फे मोर्चा काढला. यामध्ये साडेतीनशेहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले. जैन मंदिर, राम आळी, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टँड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये निषेधाचे फलक दाखवण्यात आले तसेच हाताला काळ्या फिती लावल्या होत्या. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे निवेदन सादर केले.
झारखंड येथे जैन समाजाच्या सम्मेद शिखर तीर्थ कल्याणभूमी या धर्मस्थळाचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाविरोधातही निषेध नोंदवण्यात आला. याबाबत राज्य सरकारने पुढील महिन्यात जैन समाजाला बाजू मांडण्याची संधी दिली असून हे पर्यटनस्थळ होणार नाही, असा दावा सकल जैन समाजाने मूक मोर्चानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला. मोर्चानंतर जैन भवन येथे पत्रकार परिषद झाली.  या पत्रकार परिषदेला भरत जैन, महेंद्र गुंदेचा व अजित शिराळकर या प्रमुखांसह दिलीप संघवी, मनिष जैन, अरविंद जैन, अशोक मणियार, मुकेश गुंदेचा, नीलेश शाह, भैरू ओसवाल, सूर्यकांत कटारिया, रिंकेश जैन, जयंतीलाल ओसवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button