गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेेंबर या कालावधीत सरस प्रदर्शन व विक्री
रत्नागिरी : जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्हा व कोकण विभागातील जिल्हे मिळून 60 उत्पादने व 15 जेवणाचे स्टॉल असे एकूण 75 स्वयं सहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. स्वयं सहाय्यता समूह यांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. प्रदर्शनाचा कालावधी हा डिसेंबर महिन्यात असल्याने पर्यटक, भाविक व शाळांच्या सहली मोठया प्रमाणात भेट देत असतात. त्याचा फायदा उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास होईल. असे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. तर या प्रदर्शनाचा कालावधीत सायंकाळी स्वयंसहाय्यता समूहातील सदस्य यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. तसेच सहभागी स्टॉल मधील सहभागी महिलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी केले आहे.