गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी : गोवा बनावटीच्या इंग्लिश दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी 2.30 वा. करण्यात आली. काजरघाटी तिठा येथे केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून गाडीसह एकूण 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माहेश्वर हनुमंत मोरे (36,रा.कुडाळ, सिंधुदुर्ग ), सचिन हरिश्चंद्र तळेकर (42, मूळ रा. वरळी सध्या रा. कणकवली, सिंधुदुर्ग ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी नाकाबंदी करण्यात आली होती. स्विफ्ट कार (जीए-05-बी-2005) मधून हे संशयित दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून 26 हजार रुपयांची दारू आणि 1 लाख 10 हजार रुपयांची गाडी असा एकूण 1 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.