
मुख्यमंत्री दौरा : पोलिसांनी अडवल्या बारसू-रिफायनरी विरोधकांच्या गाड्या; 14 जण नजर कैदेत
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौर्यावेळी बारसू-रिफायनरी प्रकल्प विरोधकांंनी भरलेल्या तीन गाड्या तपासणी नाक्यावर पोलिसांनी अडवून त्यांना माघारी पूर्णगड पोलिस ठाण्यात पाठवले. तीन गाड्यांमधील 14 प्रकल्प विरोधक शेतकरी, ग्रामस्थांना पूर्णगड पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या चेक पोस्टवर नाटे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या पथकासह शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडून पावस ते रत्नागिरी येणार्या रस्त्यावर भाट्ये पुलाच्या अलिकडे ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
शिवणे खुर्दमधील काशिनाथ गोर्ले, संजना बोळे,पल्लवी आरेकर, रंजना घाडी, आनंद बेडेकर, अंकुश आरेकर, प्रशांत घाणेकर, कपिल वाईम, प्रिया आरेकर तर गोवळमधील विजय घाडी, गणेश केळंबेकर, प्रतीक्षा कांबळे, राखी हातणकर; देवाचे गोठणे येथील राकेश करगुटकर अशी 14 जणांची नावे आहेत. अनुचित प्रकार होण्यापासून रोखण्यासाठी हा बंदोबस्त करण्यात आला होता.