
अंत्ययात्रा नेत असताना वहाळात बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वांची बोबडी वळली, राजापुरातील घटना
राजापूर शहरातील वरचीपेट येथील स्मशानभूमीच्या रस्त्यावर अंत्ययात्रा घेवून जात असलेल्या नागरिकांना वहाळालगत बिबट्या पाणी पितानाचे दर्शन झाल्याने सार्यांचीच बोबडी वळली. हे दृष्य पाहताच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांत एकच गोंधळ झाला. कसेबसे अंत्यसंस्कार करून जीवाच्या भीतीने पळापळ करीत नागरिक घरी परतले. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.शहरातील वरचीपेठ येथील स्मशानभूमी तशी एकांतात आहे. शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी येथील रहिवासी विनायक सावंत यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. ही अंत्ययात्रा स्मशानरोडवरून जात असताना तेथील नजिकच्या वहाळात एक बिबट्या पाणी पित असल्याचे अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांना दिसले. यामुळे त्यांच्यात एकच थरकाप उडाला. तशाही स्थितीत अंत्यसंस्कार सहभागी नागरिकांनी स्मशानभूमी गाठून अंत्यसंस्कार कसेबसे पूर्ण केले व आपापले घर गाठले. मात्र या प्रकारामुळे वरचीपेठ येथे सायंकाळी फिरणे धोकादायक झाले असल्याने वनगात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी येथील नागरिकांनी वनखात्याकडे केली आहे. www.konkantoday.com